Tuesday, 26 February 2019

तो क्षण




   तो क्षण ... 

स्वतःच्याच घराला परकं झाल्याची जाणीव जेव्हा पहिल्यांदा झाली... आता मला 'सांभाळून जा बरं' असं क्वचितच कुणी म्हणणारं होतं, कारण सांभाळून घेणारा सोबतीलाच असणार होता, कायम... माझा जोडीदार, दोन्ही हात जोडून निरोप घेत होता सोयऱ्यांचा. पलीकडूनही काही हात जुळलेले होते आणि अनेक डोळे पाणावलेले ... 
आई... नजर चुकवित होती. तरीही, तिच्या डोळ्यात भरती आलेला समुद्र मी पाहिला होता... त्या लाटांत मला परत खेचण्याची ताकद आहे हे तिला ठाऊक होतं आणि त्याचीच भीती असावी बहुधा तिला... पण माझा निरोप घेणं तर भाग होतं!
भाऊ... पाठीशी भक्कम उभा. एव्हाना मनातल्या वादळांना शांत करणं आणि भावनेच्या पुराला बांध घालून अडवणं तो चांगलाच शिकला होता... Afterall, experience is the best teacher!   
मामा, मामी, आत्या, आजी, मावशी, काकू, काका, भाऊ, बहिणी, जावई... माझ्या जिवा भावाची प्रत्येक व्यक्ती होती तिथे; माझ्या मंगल भविष्याची कामना करत मला निरोप द्यायला सज्ज...पाठीशी सुटणार सारं काही नजरेत कैद करायचा माझा वेडा प्रयत्न फोटोग्राफरने अचूक टिपलेला...
          तरीही बरच काही सुटत होतं... सगळं काही मनासारखं असूनही मन मात्र उदास होतं... पुढे बघावं तर प्रेमाने बहरलेलं भविष्य हात पसरवून कवेत घ्यायला तयार आणि माघारी मायेने समृद्ध असा भूतकाळ ओल्या डोळ्याने निरोप द्यायला उभा... 
 सारं काही नजरेच्या कक्षेत एकाच वेळी सामावलेलं... 

आणि तरीही नजर, व्याकुळ. .. ... का? कारण माझी अवस्था तशीच, जसं जत्रेत हरवलेलं मुल... गर्दी तर होती, चिंता करणाऱ्या नजराही होत्याच सभोवताली... 

पण, बाबा .................... तुम्ही नव्हते... 

          या आयुष्याच्या जत्रेत तुमचा हात सुटला आणि माझं विश्वच हरवलं... गर्दी आहे इथे माणसांची; पण तरीही मी एकटीच...बावरलेली... तुम्ही गेल्यावर, मी स्वतःला हरवल्यावर झालेली माझी अवस्था कुणाला फारशी कळू दिली नाही मी. कठीण प्रसंगात तुम्ही सांगितल्या प्रमाणे शहाण्या सारखी वागली मी बाबा... पण भेदरलेल्या नजरेने तुमचाच शोध घेत फिरत होती मी..... त्या दिवशी सुद्धा.
          माझी विदाई करायला उपस्थित असलेल्या सग्या सोयऱ्यांना कुणी सांगावं... कि तुम्ही गेलात त्याच दिवशी माझी पाठवणी झाली होती... माझं माहेरपण आणि तुमचा श्वास एकाच वेळी संपला होता ना! बाप नसलेल्या पोरांना होणारा दुनियेचा सासुरवास आम्हाला का चुकणार होता??
          भूत आणि भविष्याच्या मध्ये उभा माझा वर्तमान तुमच्याशिवाय अधूराच होता बाबा...  
          पण काय गम्मत आहे ना! माझं कन्यादान तुमच्या हाताने होण्याइतकं पुण्य माझ्या नशिबात नसलं, तरी तुमच्या पोटी जन्माला यायलाही कमी संचित लागलं नसेलच... त्या अर्थाने मी भाग्यवानच म्हणायला हवी!  .... वाईटातही चांगलं शोधायला तुम्हीच शिकवलं ना बाबा?
आणि एक सांगू? तसं पाहावं तर आयुष्याने अनेक कसोट्या लावल्या खऱ्या; पण दैवानेहि साथ दिली, बरेचदा... नाहीतर लग्नानंतर आपल्या माणसांचा निरोप घेऊन दुसऱ्या माहेरी जाणं किती मुलींच्या भाग्यात असतं...? पण माझ्या भाग्यात ते आलं...
          अवेळी पोरका झालेला माझा भूतकाळ आता निश्चिन्त होता.. कारण पाठवणी करताना माझ्या पाठीवर तुमचा हात नसला, तरी स्वागत करायला माझ्या नव्या घरी उभ्या असलेल्या सासऱ्यांच्या डोळ्यातून मायेने माझ्याकडे बघताना मला तुम्हीच दिसलात बाबा...
सासू-सासऱ्यांच्या रूपात मिळालेले आई-बाबांचे प्रेम...आप्त जणांची माया... आणि जोडीदाराची खंबीर साथ...माझे माहेर 'दुरावले' नाही, तर 'दुणावलेय', बाबा!
          नियतीच्या खेळात मदतीचे हात कमी होताना दिसल्यावर, हरण्याच्या भीतीने डळमळणारी तुमची श्रद्धा; आता परत एकदा आपल्या माणसांच्या साथीने 'अढळ' उभी राहू पाहतेय...
तुमचा आशिष सदैव पाठीशी राहो, हीच निर्मळ आशा 🌹🙏

Tuesday, 15 December 2015

काही तरी चुकतंय …

सगळं आलबेल आहे.
गिळायला अन्न, हाताला काम, राहायला घर आहे … पण काय माहित का तर,
काही तरी चुकतंय…

रोज बघावं आरशात तर छान view दिसतो, सोबतीला cosmetics चा लवाजमाहि असतो…
या टापटीप चेहऱ्यावर हसू असलं, तरी मनात काहीतरी सलतंय … काय माहित का तर,
काही तरी चुकतंय…

बोलावं कि नको - मन आणि डोकं भांडतायत,
बोलल्यावर  बघितलं ना काय झालं ? असा प्रश्न करून  डोकं मनाला गप्प करतंय…
काय माहित का तर … पण काहीतरी चुकतंय…

कुणाचं काही बिघडवलं नाही मी, मग  माझ्याच वाट्याला का हे सगळं येतंय
मी माझी मज्जेत असते - हेच का या जुलमी लोकांना सलतंय ?
राग या परक्यांचा आपल्यांवरच  काढतेय … काय माहित का तर,
काही तरी चुकतंय…

बदलावं बदलावं म्हणून स्वभावाला अंकुश लावलेत , नंतर त्रास नको म्हणून आधीच काही लोक दूर सारलेत
ती वाट वाकडी म्हणून रस्ते हि बदलले, politically correct राहावं म्हणून असं काय काय चाललंय …
(म्हणूनच कि काय ?) पण तरीही …
काय माहित का तर … काहीतरी चुकतंय …

जगतांना जगून घ्यावं - आजचा दिवस शेवटचा असं  समजून चालावं
मनमोकळ हसावं आणि ढसाढसा रडावं
कळतंय सगळं ..  अगदी सगळं. तरीही घोडं कुठे अडतंय …
काय माहित का तर … पण राव, काही तरी चुकतंय …  काहीतरी चुकतंय …









Monday, 17 June 2013

नव्याने सुरुवात...

                                                         । । श्री गणेशाय नमः । । 
 
आज बर्याच दिवसांनी असा वेळ मिळाला… स्वतःसाठी…
विचारांना लेखणीची साथ कित्येक दिवसांपासून मिळाली नव्हती…
खरंतर आपण म्हणतोच फक्त… आजकाल लोक स्वतःसाठीच जगतात , स्वतःचाच विचार करतात , बाकी जगाशी काही एक देणं घेणं नसतं  त्यांना… पण खरंच असं आहे का?
स्वतःसाठी तरी कुठे वेळ असतो आपल्याला… नुसतंच घड्याळाच्या काट्यावर आणि पैश्याच्या मागावर पायपीट करणारे आपण…  जगतो कुठे?… स्वतःसाठी काय नि कोणासाठी काय… अर्थात अपवाद आहेतच यालाही . . 'सन्माननीय अपवाद ' म्हणणं जास्त योग्य होईल !

असो… वेळ मिळाला (कि काढला?), ते महत्वाचं … हातात लेखणी नाही पण keyboard ने तर आणखीच सोय केलीय . आता हस्ताक्षर उर्फ Handwriting कशी आहे याचीही चिंता नाही! लिहित जायचं… बस… मनात आलं  ते… शब्दाच्या होडीवर अशी बर्याच दिवसांनी सैर करायला मिळतेय… छान वाटतंय…

विचार आणि लेखणीच नातं पण काय गमतीचं आहे नं? विचार हे जोपर्यंत विचारच असतात, तोपर्यंत त्यांना हवं तसं वळवता येतं… त्यांना कृतीत उतरवायचं कि नुसतंच सोडून द्यायचं हे पण आपल्या हातात असतं… हे जरी खरं  असलं तरी आपण विचारांना वळवण्या ऐवजी तेच आपल्याला नाचवत असतात कायम … पण त्यांना असं लेखणीत कैद केलं कि कधी कधी प्रेमात पडायला होतं  या विचारांच्या… कधीतरी काहीतरी लिहिलेलं, नंतर कधीतरी वाचताना जी मजा येते, जे समाधान मिळतं ते शब्दात सांगणं कठीण होऊन जातं… बाबांना लिहिलेलं पहिलं non-academic पत्रं… डोळ्यात इतक्या सहजी पाणी आणत आजही… ती आई साठी लिहिलेली कविता… मैत्री तुटल्यावर कवितेत व्यक्तं केलेलं दुखः… बाजारात भाजी विकायला बसलेल्या लहान  मुलाच्या चेहऱ्यावर बघितलेली ती निरागसता, जी कागदावर अगदी सहज उतरत गेली… भावाने self motivation म्हणून लिहिलेली note (जी मला आयुष्यभर motivate करायला पुरेशी आहे )… बघून वाटतं किती मोठा ठेवा आहे आपल्याकडे …जो योग्य वेळी जपला नसता तर स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलं असतं…

असाच  ठेवा जपत आणि समृद्ध करत रहायचंय…कायम…

माझ्या लेखणीला तलवारीची धार नाही देता आली तरी समयीच्या प्रकाशाची शुद्धता आणि प्रसन्नता लाभू दे - हीच ईश्वर चरणी प्रार्थना….