तो क्षण ...
स्वतःच्याच घराला परकं झाल्याची जाणीव जेव्हा पहिल्यांदा झाली... आता मला 'सांभाळून जा बरं' असं क्वचितच कुणी म्हणणारं होतं, कारण सांभाळून घेणारा सोबतीलाच असणार होता, कायम... माझा जोडीदार, दोन्ही हात जोडून निरोप घेत होता सोयऱ्यांचा. पलीकडूनही काही हात जुळलेले होते आणि अनेक डोळे पाणावलेले ...
आई... नजर चुकवित होती. तरीही, तिच्या डोळ्यात भरती आलेला समुद्र मी पाहिला होता... त्या लाटांत मला परत खेचण्याची ताकद आहे हे तिला ठाऊक होतं आणि त्याचीच भीती असावी बहुधा तिला... पण माझा निरोप घेणं तर भाग होतं!
भाऊ... पाठीशी भक्कम उभा. एव्हाना मनातल्या वादळांना शांत करणं आणि भावनेच्या पुराला बांध घालून अडवणं तो चांगलाच शिकला होता... Afterall, experience is the best
teacher!
मामा, मामी, आत्या, आजी, मावशी, काकू, काका, भाऊ, बहिणी, जावई... माझ्या जिवा भावाची प्रत्येक व्यक्ती होती तिथे; माझ्या मंगल भविष्याची कामना करत मला निरोप द्यायला सज्ज...पाठीशी सुटणार सारं काही नजरेत कैद करायचा माझा वेडा प्रयत्न फोटोग्राफरने अचूक टिपलेला...
तरीही बरच काही सुटत होतं... सगळं काही मनासारखं असूनही मन मात्र उदास होतं... पुढे बघावं तर प्रेमाने बहरलेलं भविष्य हात पसरवून कवेत घ्यायला तयार आणि माघारी मायेने समृद्ध असा भूतकाळ ओल्या डोळ्याने निरोप द्यायला उभा...
सारं काही नजरेच्या कक्षेत एकाच वेळी सामावलेलं...
आणि तरीही नजर, व्याकुळ. .. ... का? कारण माझी अवस्था तशीच, जसं जत्रेत हरवलेलं मुल... गर्दी तर होती, चिंता करणाऱ्या नजराही होत्याच सभोवताली...
आणि तरीही नजर, व्याकुळ. .. ... का? कारण माझी अवस्था तशीच, जसं जत्रेत हरवलेलं मुल... गर्दी तर होती, चिंता करणाऱ्या नजराही होत्याच सभोवताली...
पण, बाबा .................... तुम्ही नव्हते...
या आयुष्याच्या जत्रेत तुमचा हात सुटला आणि माझं विश्वच हरवलं... गर्दी आहे इथे माणसांची; पण तरीही मी एकटीच...बावरलेली... तुम्ही गेल्यावर, मी स्वतःला हरवल्यावर झालेली माझी अवस्था कुणाला फारशी कळू दिली नाही मी. कठीण प्रसंगात तुम्ही सांगितल्या प्रमाणे शहाण्या सारखी वागली मी बाबा... पण भेदरलेल्या नजरेने तुमचाच शोध घेत फिरत होती मी..... त्या दिवशी सुद्धा.
माझी विदाई करायला उपस्थित असलेल्या सग्या सोयऱ्यांना कुणी सांगावं... कि तुम्ही गेलात त्याच दिवशी माझी पाठवणी झाली होती... माझं माहेरपण आणि तुमचा श्वास एकाच वेळी संपला होता ना! बाप नसलेल्या पोरांना होणारा दुनियेचा सासुरवास आम्हाला का चुकणार होता??
भूत आणि भविष्याच्या
मध्ये उभा माझा वर्तमान तुमच्याशिवाय अधूराच होता बाबा...
पण काय गम्मत
आहे ना! माझं कन्यादान तुमच्या हाताने होण्याइतकं पुण्य माझ्या नशिबात नसलं, तरी तुमच्या
पोटी जन्माला यायलाही कमी संचित लागलं नसेलच... त्या अर्थाने मी भाग्यवानच म्हणायला
हवी! .... वाईटातही चांगलं शोधायला तुम्हीच शिकवलं ना बाबा?
आणि एक सांगू? तसं पाहावं तर आयुष्याने अनेक कसोट्या लावल्या खऱ्या; पण दैवानेहि साथ दिली, बरेचदा... नाहीतर लग्नानंतर आपल्या माणसांचा निरोप घेऊन दुसऱ्या माहेरी जाणं किती मुलींच्या भाग्यात असतं...? पण माझ्या भाग्यात ते आलं...
आणि एक सांगू? तसं पाहावं तर आयुष्याने अनेक कसोट्या लावल्या खऱ्या; पण दैवानेहि साथ दिली, बरेचदा... नाहीतर लग्नानंतर आपल्या माणसांचा निरोप घेऊन दुसऱ्या माहेरी जाणं किती मुलींच्या भाग्यात असतं...? पण माझ्या भाग्यात ते आलं...
अवेळी पोरका
झालेला माझा भूतकाळ आता निश्चिन्त होता.. कारण पाठवणी करताना माझ्या पाठीवर तुमचा हात
नसला, तरी स्वागत करायला माझ्या नव्या घरी उभ्या असलेल्या सासऱ्यांच्या डोळ्यातून मायेने
माझ्याकडे बघताना मला तुम्हीच दिसलात बाबा...
सासू-सासऱ्यांच्या रूपात मिळालेले आई-बाबांचे प्रेम...आप्त जणांची माया... आणि जोडीदाराची खंबीर साथ...माझे माहेर 'दुरावले' नाही, तर 'दुणावलेय', बाबा!
सासू-सासऱ्यांच्या रूपात मिळालेले आई-बाबांचे प्रेम...आप्त जणांची माया... आणि जोडीदाराची खंबीर साथ...माझे माहेर 'दुरावले' नाही, तर 'दुणावलेय', बाबा!
नियतीच्या खेळात मदतीचे हात कमी होताना दिसल्यावर, हरण्याच्या भीतीने डळमळणारी तुमची श्रद्धा; आता परत एकदा आपल्या माणसांच्या साथीने 'अढळ' उभी राहू पाहतेय...
तुमचा आशिष सदैव पाठीशी राहो, हीच निर्मळ आशा 🌹🙏

No comments:
Post a Comment